Top News

Crop Insurance : १९ हजार शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांचा ठेंगा; खरीप,रब्बी हंगामातील विमा कागदावरच

 



केळवद : निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे म्हणून पीकविमा काढले जातो. मात्र,सावनेर तालुक्यातील १९ हजार ३३८ शेतकरी यापासून वंचित राहीले. तर शासन आणि पीकविम्या कंपन्यांना वारंवार विचारणा करूनही त्यांनी निराशा केली. यावर्षीचा खरीप व रब्बी हंगामातील विमा कागदावरच दिसून येतो.


शासनाने एक रुपयांमध्ये शेतकऱ्‍यांना पंतप्रधान पीकविमा योजना देण्याचे जाहीर केले. तसेच नोंदणीदेखील केली. तसेच शेतकऱ्‍यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस कीटकांचा प्रार्दुभाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्‍यांच्या तोंडाशी घास हिरावला गेला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.


पीकविमा काढल्यामुळे त्यांची मदत होईल, अशी अपेक्षा असताना सावनेर तालुक्यातील १९ हजार ३३८ शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत. तालुक्यातील २१ हजार ८६६ शेतकऱ्‍यांनी खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा काढला.


त्यातील तक्रार दाखल केवळ २ हजार ५२८ शेतकऱ्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळाला. हे प्रमाण अत्यल्प असून तालुक्यात पीक कापणीचा अहवाल चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अस्मानी संकटे झेलणाऱ्‍या बळीराजावर संकटांची मालिका थांबता- थांबत नाही. खरीप व रब्बी हंगामात काढलेला पीकविमा अद्यापही मिळाला नाही. पुढील महिन्यात परत शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होईल. पीकविमा देणार तरी कधी असा प्रश्न पडला आहे.


या पिकांसाठी विमा संरक्षण

खरीप हंगामातील ज्वारी, मुंग, उडीद, तूर, कपाशी, मक्का, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन तर रब्बी हंगामातील गहु, हरभरा, कांदा, उन्हाळी भुईमूग या पिकांना पीकविम्याचे संरक्षण आहे.


केवळ अडीच हजार शेतकऱ्यांना लाभ

सावनेर तालुक्यात खरीप व रब्बी हंगामातील २१ हजार ८६६ इत्यादी शेतकऱ्‍यांनी पीकविमा काढला. यापैकी तक्रारदार २ हजार ५२८ शेतकऱ्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळाला. तर सोयाबीन उत्पादक ६९८ शेतकऱ्‍यांना सरसकट पीकविमा मिळाला. तालुक्यातील १९ हजार ३३८ शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही.


विमा कंपनीकडून आश्वासनाची खैरात

तालुक्यातील पीकविम्याच्या लाभापासून वंचित असणाऱ्‍या शेतकऱ्‍यांना पीकविमा कधी मिळणार याबाबत विचारणा केली. तेव्हा विम्याचा लाभ मिळेल, असे आश्वासन विमा कंपनीचे अधिकारी देऊन मोकळे होतात.मात्र विम्याचा लाभ देण्यात ते अपयशी ठरत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने