देशातील बॅंकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँक ऑफ महाराष्ट्र या आघाडीच्या बॅंकेला दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयकडून हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयच्या कर्ज प्रणाली ऑफर डिलिव्हरी ऑफ बँक क्रेडिट, सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क इन बँक क्रेडिट आणि केवायसी नियमांबाबत जारी केलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे महाराष्ट्र बॅंकेला 1 कोटी 27 लाख 20 रूपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे.
बॅंकेच्या आर्थिक स्थितीची पाहणी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँक ऑफ महाराष्ट्रच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली. 31 मार्च 2023 पर्यंत करण्यात आलेल्या या पाहणीत महाराष्ट्र बॅंकेने आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर आता आरबीआयने महाराष्ट्र बँकेला नोटीस बजावत, आपल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँकेला जास्तीत जास्त दंड का लावू नये, अशी विचारणा केली आहे. तसेच याप्रकरणी बॅंकेने 1 कोटी 27 लाख 20 रूपये इतका दंड आरबीआयकडे जमा करावा, असे निर्देश देखील दिले आहेत.
काय आहे कारवाईचे कारण
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) याबाबत म्हटले आहे की, तथ्यांची तपासणी केल्यानंतर महाराष्ट्र बँकेवरील हे आरोप समोर आले आहेत. त्यामुळे आता बॅंकेकडून दंड आकारला जाणार आहे. दरम्यान, काही कर्जदारांच्या बाबतीत, मंजूर निधी खेळत्या भांडवलाच्या मर्यादेनुसार पूर्ण केला गेला आहे. याची खात्री करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे. जी किमान थकित कर्जाच्या विहित टक्केवारी इतकी आहे. असे कारण देखील कारवाई मागे असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. याशिवाय आरबीआयला अन्य कारणे देखील आढळून आली आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि तिच्या ग्राहक यांच्यात झालेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर निर्णय देणे हा यामागील हेतू नाही. बँकेवर लावण्यात आलेला दंड कोणत्याही पूर्वग्रहाने ठोठावण्यात आलेला नाही, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा