Top News

Farm Enumeration : शेतमोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सक्ती

 




Jalgaon News : आधार, पीएम किसानसंबंधीच्या अडचणी व अन्य कार्यवाहीसाठी जशी ऑनलाइन प्रक्रिया प्रशासन राबवीत आहेत, तशीच प्रक्रिया शेतमोजणीच्या अर्जासाठी राबविली जात आहे. पूर्वीप्रमाणे ऑफलाइन अर्ज भूमी अभिलेख विभागात स्वीकारले जात नसल्याची स्थिती आहे.


पूर्वी ऑफलाइन अर्ज स्वीकारून शेतमोजणी मागणी अर्जाच्या स्वरूपानुसार शुल्क भरले जात होते. हे शुल्क भरल्याची पावती भूमी अभिलेख विभागात जमा केल्यानंतर परिपूर्ण अर्ज स्वीकारल्याची कार्यवाही व्हायची, परंतु आता ऑनलाइन अर्ज संबंधित पोर्टलवर दाखल करावे लागत आहेत.


हे अर्ज शेतकरी घरी किंवा भूमी अभिलेख कार्यालयात दाखल करू शकत नाहीत. त्यासाठी आता महाईसेवा केंद्राची मदत घ्यावी लागत आहे. त्यात १०० रुपयांपर्यंतचा खर्च येत आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाइन केल्याने पेपरलेस कामकाज होत आहे. परंतु शेतकऱ्यांचा अर्ज करण्यासंबंधीचा खर्च वाढला आहे. तसेच त्यासाठी महा ई-सेवा केंद्राचा शोध, तेथे दोन तास थांबून अर्ज प्रक्रिया पार पडते. मध्येच सर्व्हरची समस्या असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


अनेक अर्ज प्रलंबित

भूमी अभिलेख विभागात शेतमोजणीसाठी केलेले अनेक शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. हे अर्ज केव्हा निकाली निघतील, हादेखील मुद्दा आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शेतकरी अर्ज पावती घेऊन भूमी अभिलेख कार्यालयात जात आहेत.


ही पावती दाखविल्यानंतर मोजणी केव्हा होईल, याची तारीख, माहिती मिळत नाही. यात निवडणुकीच्या धामधुमीत कुणी कुणाची दखल या विभागात घेत नव्हते. याचाही फटका मोजणी कार्यवाहीस बसला असून, अनेक अर्ज जळगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती मिळाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने