Top News

SSC HSC Board Exam : बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २४ फेब्रुवारीपासून





  पुणे - विद्यार्थ्यांनो, तुम्ही दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमचे अभ्यासाचे वेळापत्रक थोडेसे अलीकडे घेऊन ठेवा. होय, कारण राज्य मंडळाने यंदा दहावी- बारावीच्या परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, दरवर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा आठ ते दहा दिवस अगोदरच सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ९ शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणारी बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.


राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्य मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते. तर बारावीचा निकाल मे महिन्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जातात. अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकालही लवकर जाहीर करणे, याचा सारासार विचार करता फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणारी बारावी-दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधी आयोजित करण्याचा राज्य मंडळाचा मानस आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले. त्यानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा राज्य मंडळाने जाहीर केल्या आहेत.


शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर केल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच या तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या २३ ऑगस्टपर्यंत 'secretary.stateboard@gmail.com' या ईमेलवर पाठवाव्यात, असे राज्य मंडळाने नमूद केले आहे.


दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियोजित तारखा :

तपशील : लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी

• बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) आणि उच्च माध्यमिक व्यवसाय

अभ्यासक्रम : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५

• बारावी- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन : २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५

• दहावी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५

• दहावी- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२५

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने