Top News

शिकाऊ वाहन परवाना प्रक्रियेत आरटीओकडून बदल; आता काय होणार?





  पुणे : एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी चालविण्याचा पक्का परवाना असेल, तर त्याला मोटार चालविण्याचा शिकाऊ परवाना विनाचाचणी ऑनलाइन मिळतो. त्यासाठी त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची आवश्यकता नसते. मात्र, मागील काही महिन्यांपासून ऑनलाइन यंत्रणेतील तांत्रिक अडचणीमुळे अर्जदारांना आरटीओत हेलपाटे मारावे लागत होते. यावर अखेर तोडगा निघाल्याने अर्जदारांना शिकाऊ परवाना ऑनलाइन मिळण्यास सुरुवात झाली आहे.


आरटीओच्या अनेक सेवा ऑनलाइन आहेत. या सेवेत वारंवार तांत्रिक अडचणी आल्याने नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. अशा नागरिकांची लूट मध्यस्थ करतात. आरटीओत मध्यस्थांकडून सुरू असलेली लूट आणि गैरप्रकारांबाबतचे वृत्त लोकसत्ताने दिले होते. त्यानंतर याबाबत पावले उचलण्यात आली आहेत. नागरिकांना ऑनलाइन सेवा मिळाव्यात आणि त्यांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी आरटीओकडून कार्यवाही सुरू झाली आहे.



 


एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी चालविण्याचा पक्का परवाना असेल, तर त्याला इतर वाहनाचा शिकाऊ परवाना ऑनलाइन मिळतो. त्यासाठी त्याला चाचणी देण्याची आवश्यकता नाही. ही ऑनलाइन सेवा २०२१ पासून सुरू असूनही नागरिकांना ती उपलब्ध झालेली नव्हती. याबाबत राष्ट्रीय सूचना केंद्रात बुधवारी बैठक झाली. त्यात या सेवेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन शिकाऊ परवाना मिळू लागला आहे.


याबाबत प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, की नागरिकांना देण्यात येणाऱ्या ऑनलाइन सेवेतील अडचणी दूर केल्या जात आहेत. शिकाऊ परवान्याबाबत अनेक तक्रारी आहेत. शिकाऊ परवाना देताना अर्जदाराची हालचाल झाल्यास तो अनुत्तीर्ण होतो. आरटीओतील कर्मचारी अशा अर्जदारांच्या अर्जाची ऑनलाइन छाननी तातडीने करीत आहेत. त्यात तांत्रिक चुकीमुळे अर्जदार अनुत्तीर्ण झाला असेल, तर त्याला उत्तीर्ण केले जात आहे. त्यामुळे त्याला आरटीओमध्ये येण्याची आवश्यकता राहत नाही.


 

आधारकार्डची समस्या कायम वाहन चालविण्याच्या शिकाऊ परवाना ऑनलाइन देण्याच्या प्रक्रियेत अर्जदाराच्या आधारकार्डवरील मधल्या नावाची समस्या आहे. देशभरात अर्जदाराचे मधले नाव बंधनकारक नसले, तरी महाराष्ट्रात बंधनकारक आहे. त्यामुळे मधल्या नावाची अट काढून टाकायली हवी. याचबरोबर आधी पक्का परवाना असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या वाहन प्रकाराचा शिकाऊ परवाना काढतानाही ‘आधार’मुळे अडचणी येत आहेत. त्यावर तातडीने तोडगा काढायला हवा, असे महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार दुग्गल यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने