Akola News : गेल्या वर्षातील खरीप तसेच रब्बी हंगामात कपाशी, हरभरा पिकाचे पावसामुळे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईसाठी जिल्ह्यात पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी दावे केले होते. अशा प्रकारे दावा करून अर्धे वर्ष लोटले तरी अद्याप संबंधित शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली नाही.
त्यामुळे दावा केलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेच्या (उबाठा) वतीने देण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांना दिलेल्या निवेदन देण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, संजय अढाऊ, शिवा मोहोड व शेतकरी सेलचे उपजिल्हाप्रमुख गोपाल विखे उपस्थित होते.
खरीप हंगामात कपाशीच्या पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान केले होते. त्यावेळी कापूस उत्पादकांनी पीक विम्याचे दावे केले आहेत. रब्बीतही हरभरा पेरणीनंतर सुद्धा पावसाने पिकाचे मोठे नुकसान केले. दावा केल्यानंतर पचंनामे होऊन तत्काळ नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असताना सहा ते सात महिने होऊनही अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
लवकरच पुढील खरीप हंगाम सुरू होणार असून, शेतकऱ्यांना शेतीची मशागत, बी-बियाणे, खतांची खरेदी करणे
आवश्यक असल्याने पीक नुकसानीची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी अन्यथा जिल्हा शिवसेनेच्या
वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांना पीक
नुकसानीचे ५० कोटी रुपये पुढील आठ दिवसांत बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या वेळी
देण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा