"Latur / Dharashiv News : शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना मोफत वीज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४५ कोटी ८२ लाखाची वीजबील माफी मिळाली आहे.
एप्रिल ते जून २०२४ या तीन महिन्याच्या कालावधीतील बीलाचा फायदा लातूर जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार ६४३ तर धाराशिवच्या एक लाख ५६ हजार सहाशे शेतकऱ्यांना झाला आहे. योजनेमुळे पहिल्यांदाच तीन महिन्याचे वीजबील शून्य आले आहे.
शेतकऱ्यांना वीजबिल व कर्जमाफी देण्याची मागणी होत असताना सरकारने मागील बिलाची माफी न देता येत्या काळात शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेत जुलैमध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना हाती घेतली.
यात तीन ते साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या (एचपी) शेतीपंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एप्रिल ते जून २०२४ या त्रैमासिक बिलासाठीही ही योजना लागू करण्यात आली. त्यानुसार तीन महिन्याच्या काळातील वीजबिल माफ करण्यात आले आहे.
योजनेसाठी लातूरच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, प्रत्यक्ष लाभ दिल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या जास्त असली तरी योजनेच्या लाभाची रक्कम कमी आहे.
पहिल्या तीन महिन्याच्या बिलात लातूर जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार ६४३ शेतकऱ्यांना ७७ कोटी ७० लाख तर धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ५६ हजार सहाशे शेतकऱ्यांना ६८ कोटी १२ लाखाची वीजबिल माफी मिळाल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान तीन महिन्याच्या बिलाची आकारणी शून्य करून या काळातील चालू बिलाच्या पहिल्या हप्त्याचा भरणा महाराष्ट्र शासनाने केल्याचे नमुद करून शेतकऱ्यांना शेतीपंपांची बिले देण्यात आली आहेत. यापुढील बिलांमध्येही मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची रक्कम अशीच जमा होत राहील, असेही बिलावर नमुद करण्यात आले आहे."
टिप्पणी पोस्ट करा