Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
Rule Change From 1st May: मे महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे १ मे २०२४ पासून देशात अनेक बदल (Rule Change From 1st May) लागू करण्यात आलेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतींपासून ते क्रेडिट कार्ड बिल भरण्यापर्यंतचा समावेश आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पहिल्या तारखेपासून (LPG Cylinder Price Cut) घट झाली आहे, तर दुसरीकडे दोन बँकांच्या क्रेडिट कार्डवर आता युटिलिटी बिल पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे. जाणून घेऊया अशाच ५ मोठ्या बदलांबद्दल...
मे महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पहिला मोठा बदल झाला आहे, खरं तर तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते मुंबई पर्यंत सिलिंडरच्या दरात १९ ते २० रुपयांनी घट झाली आहे. नवीन सिलिंडरचे दर आयओसीएलच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आले आहेत. हे दर १ मे २०२४ पासून लागू करण्यात आलेत.
इंडियन ऑईलनं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार १ मे पासून मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १७१७.५० रुपयांवरून कमी होऊन १६९८.५० रुपये एवढी झाली आहे. तर दिल्लीमध्ये ही किंमत १७६४.५० रुपयांवरून १७४५.५० रुपये एवढी झाली आहे. चेन्नईमध्येही व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १९३० रुपयांवरून कमी होऊन १९११ रुपये एवढी झाली आहे.
आयसीआयसीआय बँकेने आजपासून ग्राहकांच्या बचत खात्यावरील शुल्कात बदल केला आहे. हा बदल १ मे २०२४ पासून लागू होणार असल्याचं बँकेकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आलं होते. त्याअंतर्गत डेबिट कार्डवरील वार्षिक शुल्क २०० रुपये, तर ग्रामीण भागासाठी ९९ रुपये निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय बँकेनं चेकबुकसंदर्भातील नियमातही बदल केला असून १ मेपासून २५ पानांचं चेकबुक जारी करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, मात्र त्यानंतर प्रत्येक पेजसाठी ४ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. एवढंच नाही तर आयएमपीएस व्यवहारांवर २.५० रुपयांपासून १५ रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येणार आहे.
तिसरा बदल येस बँकेच्या ग्राहकांशी संबंधित आहे. बँकेनं १ मे २०२४ पासून बचत खात्यावरील किमान सरासरी शिल्लक शुल्कात बदल केला आहे. याअंतर्गत सेव्हिंग अकाऊंट प्रो मॅक्समध्ये एमएबीत ५०,००० रुपये असेल, त्यासाठी जास्तीत जास्त १,००० रुपये आकारले जातील. सेव्हिंग अकाउंट प्रो प्लस, येस एसेन्स एसए आणि येस रेस्पेक्ट एसएमध्ये मिनिमम बॅलन्स २५,००० रुपये असेल आणि या खात्यावर ७५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. बचत खात्यात किमान १०,००० रुपये शिल्लक ठेवावे लागतील आणि त्याचे शुल्कही ७५० रुपयांपेक्षा जास्त असेल. सेव्हिंग व्हॅल्यूसाठी ५००० रुपयांची मर्यादा असून जास्तीत जास्त ५०० रुपये शुल्क आकारलं जाईल.
जर तुम्ही तुमच्या घराचं वीज बिल किंवा इतर कोणत्याही युटिलिटी बिलाचा भरणा क्रेडिट कार्डनं करत असाल तर चौथा बदल तुमच्यासाठी खास आहे. युटिलिटी बिल पेमेंटसाठी येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या युजर्सना आता अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. १ मेपासून येस बँक क्रेडिट कार्ड १५,००० रुपयांपेक्षा जास्त वीज किंवा इतर युटिलिटी बिल पेमेंटवर १% अतिरिक्त शुल्क आकारेल, तर आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्डवर २०,००० रुपयांपेक्षा जास्त बिल भरण्यावर 1% अतिरिक्त शुल्क आणि 18% जीएसटी आकारला जाईल.
पाचवा बदल म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी असला तरी हा नियम ३० एप्रिलपासून लागू झाला आहे. नवीन केवायसी नियमांनुसार, गुंतवणूकदारांनी त्यांच्या म्युच्युअल फंड अर्जावर दिलेलं नाव त्यांच्या पॅन कार्डवर दिलेल्या नावाशी मॅच असणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे बदल असल्यास त्यांचे अर्ज फेटाळले जातील. त्यामुळे पहिल्यांदाच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांचं नाव आणि जन्मतारीख त्यांच्या पॅन कार्डच्या तपशीलाशी आणि परिणामी त्यांच्या इन्कम टॅक्स रेकॉर्डशी तंतोतंत जुळणं आवश्यक आहे
टिप्पणी पोस्ट करा