मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’अंतर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेचे एक लाख ६७ हजार ग्राहक असून त्यांची यादी पुरवठा विभागाने तयार केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाणार असून सध्या या लाभार्थींचे ई-केवायसीची प्रक्रिया सुरू आहे.
उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकार एका गॅस सिलिंडरमागे ३०० रुपये अनुदान देते, तर एका गॅस सिलिंडरची बाजारातील सरासरी किंमत ८३० रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर ५३० रुपये याप्रमाणे तीन गॅस सिलेंडरच्या मर्यादेत राज्य शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. केंद्राची योजना राबविल्यास त्याचा राज्यातील महायुती सरकारला अपेक्षित लाभ मिळू शकणार नाही म्हणून राज्याची स्वतंत्र योजना म्हणून राबविण्यात येणार आहे.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा मुख्यमंत्र्यांनी आग्रह केल्याचे बोलले जात आहे. मात्र, यामुळे सरकारच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढेल, अशी चिंता नियोजन आणि वित्त विभागाने व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे तुर्तास मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ उज्वला योजनेतील लाभार्थींनाच दिला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार लाभार्थी आहेत.
‘लाडक्या बहिणी’मुळे अडकला शासन निर्णय
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बळिराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुलींना मोफत उच्चशिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, अशा योजनांचे शासन निर्णय काही दिवसांतच काढले गेले. पण, गॅस सिलिंडरच्या महागाईमुळे त्रस्त महिलांना आधार देण्यासाठी नियोजित मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अद्याप निघालेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांनाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत द्यावेत आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा येईल, या दोन मतप्रवाहात शासन निर्णय अडकल्याचे सूत्रांनी सांगितले.
शासन निर्णयानंतर योजनेची अंमलबजावणी
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अनुषंगाने शहर-जिल्ह्यातील उज्वला योजनेतील लाभार्थींची ई-केवासी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार लाभार्थींची यादी तयार ठेवली आहे. शासन निर्णय निघाल्यानंतर त्यानुसार योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
- ओंकार पडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर शहर
सध्या योजनेच्या अनुषंगाने कार्यवाही...
उज्वला योजनेतील लाभार्थींची ई-केवायसी करून घेणे
उज्वला गॅस योजनेतील लाभार्थींची यादी अंतिम करणे
प्रस्तावित मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची तालुकानिहाय प्रचार-प्रसिद्धी करणे
गॅस एजन्सी, पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन योजना लाभार्थींपर्यंत पोचविणे
टिप्पणी पोस्ट करा