PM Jan Dhan Yojana Benefits : या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर १५ ऑगस्ट २०१४ रोजी लाल किल्ल्यावरून केली होती.
प्रधानमंत्री जन धन योजनेला (PMJDY) १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर १५ ऑगस्ट २०१४ रोजी लाल किल्ल्यावरून केली होती. त्यानंतर २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना लागू करण्यात आली.
या योजनेचा मुख्य उद्देश बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या आणि बँक खातं नसलेल्यांची बँक खाती उघडणं हा होता. या योजनेसोबतच सरकारनं खातेदारांसाठी इतरही अनेक सुविधा सुरू केल्या, ज्यामुळे त्यांचं जीवनमान खूप सोपं झाले.
५३.१३ कोटी लोकांची बँक खाती
या योजनेंतर्गत देशभरात आतापर्यंत ५३.१३ कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात आली असून त्यामध्ये २,३१,२३६ कोटी रुपये जमा आहेत. विशेष बाब म्हणजे या ५३.१३ कोटी खात्यांपैकी ६६.६ टक्के म्हणजेच ३५.३७ कोटी खाती फक्त ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत. तसंच, एकूण खात्यांपैकी ५५.६ टक्के म्हणजेच २९.५५ कोटींहून अधिक जनधन खाती महिलांच्या नावावर उघडली आहेत.
रुपे डेबिट कार्ड
प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत उघडलेले बँक खातं, हे शून्य शिल्लक म्हणजेच झिरो बॅलन्स खातं आहे. यामध्ये कोणताही मिनिमम मेंनटन्स बॅनल्स ठेवण्याची गरज नाही. तसंच, जन धन खातेधारकांना मोफत रुपे डेबिट कार्ड दिलं जातं. याशिवाय, या योजनेअंतर्गत पात्र खातेधारकांना दहा हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधाही मिळते.
२ लाख रुपयांचा अपघात विमा
वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३६.१४ कोटीहून अधिक रुपे डेबिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे, जन धन योजनेंतर्गत उघडलेल्या बँक खात्यासोबत जारी केलेले रुपे डेबिट कार्ड २ लाख रुपयांचे मोफत अपघात विमा संरक्षण देते."
टिप्पणी पोस्ट करा