रत्नागिरी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनधान्याचा पुरवठा होतो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्याची अट घातली आहे.
योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध 'ई-केवायसी'तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, 'ई-केवायसी' न केलेल्यांचे धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार असून, लाभधारकाचे नाव शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रास्त दरातील धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांना' केवायसी'चे बंधन घालण्यात आले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत.
मात्र, तरीदेखील अनेक शिधापत्रिकाधारकांनी 'ई-केवायसी'ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. रेशन कार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असतानाही अनेकजण स्वस्तातील धान्य घेतात. याशिवाय अनेक लोक सध्या या जगात नाहीत, ज्यांचा मृत्यू झाला आहे.
मात्र अद्यापही त्यांची नावे शिधापत्रिकांमध्येच आहेत. दुसरीकडे बनावट रेशन कार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदलेली आहेत, त्या सर्वांना 'ई- ई-केवायसी' करावीच लागणार आहे.
त्यासाठी ते त्याच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी मुदतीत ई- केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा